Sunday, August 21, 2011

एका भारतीय विमान संशोधकाची शोकांतिका....

"प्राचीन हिंदू हवेत फ़क्त संचारच नव्हे तर युद्धेही करू शकत असत आणि त्यात प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्वाचा एखाद्या गरुडाप्रमाणे प्रयत्न करीत. हे सर्व करण्यासाठी त्यांना याबाबतीतील सर्व शास्त्रीय माहिती, वातावरण,तापमान,विविध वायूंचे विशिष्ट गुरुत्व,घनता यांचा अभ्यास करूनच प्राप्त केली असणार हे निश्चित"-----------१८८१ मध्ये अलाहाबादमधील व्याख्यानामधील कर्नल ओल्कॉट (Col. Olcott) यांचे उद्गार.

सध्याच्या सहस्त्रकात हवेत उडणार्‍या यंत्राची १०० वर्षे साजरी करतोय, पण त्याचबरोबर प्राचीन भारतीय विमानांबद्दलची उत्सुकताही या १०० वर्षांत तितक्याच प्रमाणात वाढली आहे. कारण १७ डिसें.१९०३ च्या राईट बंधूंच्या विमान उड्डाणाआधी ८ वर्षे इ.स. १८९५ मध्ये मुंबईच्या चौपाटीवर शिवकर बापूजी तळपदे आणि त्यांच्या पत्नीने हवेत उडण्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवले होते, ही नवीन माहिती उजेडात आली आहे.
इ.स. १८६४ साली महाराष्ट्रातील "पाठारे प्रभू" समाजात श्री. शिवकर बापूजी तळपदे यांचा जन्म झाला. मुंबईतील चिराबाजार येथील डुक्करवाडीत त्यांचे वास्तव्य होते.जिथे तळपदे रहात होते तो भाग आता गिरगावमधील नागिनदास शाह मार्ग म्हणून ओळखला जातो.

तळपदेंचा भारतीय वेद व संस्क्रूत साहित्याचा गाढा अभ्यास होता. तळपदेंचे एक चरित्रकार श्री. रत्नाकर महाजन यांच्या म्हणण्यानुसार, संस्क्रूत पंडीत असल्यामुळे तळपदेंना विमानशास्त्रात रूची निर्माण झाली होती. त्यांनी महर्षी भारद्वाज यांचे ब्रुहद वैमानिक शास्त्र, आचार्य नारायणमुनी यांचे विमानचंद्रिका, महाऋषी शौनिक यांचे विमान-यंत्र, महर्षी गर्गमुनी यांचे यंत्रकल्प, आचार्य वचस्पती विमानबिंदू, महर्षी धुंडीराज यांचे विमान ज्ञानार्क प्रकाशक, यांसारख्या वैदीक ग्रंथांचा अभ्यास केला होता.
तळपदे यांच्या अभ्यासात वेदांबरोबरच इतर शास्त्रज्ञांच्या शोधाचाही समावेश होता. उदा. मशिनगनचा संशोधक मॅक्झिमच्या प्रोपेलरवर चालणार्‍या वाफ़ेच्या इंजिनाचा समावेश होता तळपदेंच्या संशोधनात....!! मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते इंजिन हवेत झेपावू शकले नाही, हा भाग वेगळा!! तळपदेंचा हा इतरांच्या संशोधनाचाही त्यांना विमानशास्त्रात काहितरी करून दाखवण्याची नवी प्रेरणा देवून गेला.
शिवकर बापूजी तळपदेंनी ऋग्वेदातील काही श्लोक, तसेच वैमानिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पार्‍याचे चार सिलिंडर्स वर्तुळाकार सांगाड्यात बसवले होते. एकदा का हे सिलिंडर्स बसवले की, सूर्यकिरण आणि पारा यांच्यातील शक्तीचा वापर करून विमान आकाशात उडत असे आणि सहजतेने बरेच अंतर कापू शकत असे. विशेष गोष्ट म्हणजे "नासा" ही अमेरीकेची संस्थाही एक आयन इंजीन बनवण्याचा प्रयत्न करतेय, ज्यात गुरुत्वाकर्षणाला विरोध करण्यासाठी सध्याच्या "जेट" इंजीनाऐवजी "अति वेगवान" असे Electrified Particles वापरता येतील. बंगलोर येथील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स" या संस्थेच्या संशोधनानुसार तळपदे यांनी प्राचीन वेदांतील वैमानिक शास्त्राचा वापर करून पंडीत सुब्बार्य शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विमानाचा आराखडा केला होता. ओरविल आणि विल्बर राईट यांनी पक्ष्यांच्या उडण्याचा अभ्यास करून त्यानुसार त्यांनी त्यांच्या विमानाचा आराखडा केला होता. त्यानुसारच त्यांनी कॅलिफ़ोर्नियाच्या किटी हॉक समुद्रकिनार्‍यावर १७ डिसें १९०३ रोजी विमानाचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यांचे हे उड्डाण ३७ सेकंद हवेत यशस्वीरित्या स्थिरावले होते.

तळपदेंचा एक विद्यार्थी श्री. सातवेलकर यांच्या नोंदीनुसार तळपदे यांचे "मरुत्सखा" हे मानवरहीत विमान १५०० फ़ूट हवेत काही मिनिटे यशस्वीरित्या झेपावले आणि नंतर जमिनीवर उतरले. श्री.प्रताप वेलकर यांच्या लिखाणानुसार ज्या विमानाचा उल्लेख ऐतिहासिक विमान म्हणून केला गेला त्या विमानाचा सांगाडा तळपदेंच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे त्यांच्या राहत्या घरी धूळ खात पडला होत. वेलकर म्हणतात, तळपदेंचा एक पुतण्या रोशन तळपदे आणि त्यांच्या कुटुंबातील लोक "त्या" विमानाच्या सांगाड्यात बसत आणि आपण जणू काही आकाशातच विहार करीत आहोत अशी कल्पना करीत. विलेपार्ले येथील विमानांच्या प्रदर्शनात "मरुत्सखा"ची प्रतिकृतीही मांडण्यात आली होती. (संदर्भ:- टाईम्स ऑफ़ इंडिया,१८ ऑक्टो,२००४)

वेलकरांना याच गोष्टीची खंत आहे की तळपदे यांच्या विमानाला "नेहरू सेंटर" सारख्या वैज्ञानिक वस्तूसंग्रहालयातही स्थान मिळाले नाही. मात्र,या ऐतिहासिक प्रयोगाबाबतची काही महत्वाची कागदपत्रे आजही बंगलोरच्या "हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड" या संस्थेत जतन करून ठेवण्यात आली आहेत.
श्री.तळपदे या प्रयोगापुढे आणखी संशोधन करू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी अहमदाबाद येथील सर्वसाधारण सभेत तसे ५००००/- साठी जाहीर आवाहनही केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. याउलट अमेरीकेतील लश्कराने राईट बंधूंना त्यांच्या पुढील संशोधनासाठी २५००० डॉलर्सची मदत केली होती. केवढा हा विरोधाभास? याचाच परिणाम म्हणून राईट बंधूंनी अमेरिकेच्या युद्धाची गणितेच पार बदलून टाकली. याचे जगावर झालेले परिणाम पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात विमानांच्या वापरामुळे सार्‍या जगाने पाहिले आहेत? अशीच मदत जर तळपदेंना मिळाली असती तर??????

श्री. तळपदेंच्या मुंबईच्या चौपाटीवरील विमानाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी बडोद्याचे संस्थानिक श्री. सयाजीराव गायकवाड, न्यायमूर्ती रानडे हे उपस्थित होते. श्री. गायकवाड हे तर तळपदेंच्या प्रयोगामुळे इतके भारवले की, त्यापुढे तळपदेंच्या पाठीशी त्यांच्या प्रत्येक प्रयोगात ते खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र, त्यावेळी हिंदुस्थानवर ब्रिटिश राजवट होती. एका भारतीयाने एखादा अद्वितीय शोध लावावा आणि तोही प्राचीन भारतीय वेदांचा अभ्यास करून ही भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व इंग्रजांना रुचले नाही. त्यामुळे श्री
.तळपदेंचा हा यशस्वी प्रयोग इंग्रजांनी यशस्वीरित्या दाबून टाकला. त्यांनी प्रथम श्री. तळपदेंचा प्रमुख आर्थिक मदतीचा स्रोत म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर दबाव टाकून ते तळपदेंना करत असलेली मदत ताबडतोब बंद करण्यास सांगितले. त्यामुळे तळपदेंचा आर्थिक कणाच मोडून पडला. त्यांनी पुढील प्रयोगासाठी वापरलेला पैसा परत करण्यासाठी तर त्यांच्या कुटुंबियांना ऐतिहासिक विमान "मरुत्सखा"चे सुटे भागही विकावे लागले.याचा प्रचंड मानसिक धक्का बसून तळपदेंच्या पत्नीचे देहावसान झाले. "मरुत्सखा" बरोबरच आपल्या कुटुंबियांची होत असलेली पडझड तळपदेंना आणखी बघवली नाही.

दुर्दैवाने त्यांचे "विमानशास्त्रा"तील लक्ष उडाले. तळपदेंचे चरित्रकार श्री.वेलकर यासंदर्भात लिहितात की, उडण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पण पंख कापलेल्या एखाद्या पक्ष्यासारखी तळपदेंची अवस्था झाली होती.
विमानशास्त्रातील संशोधनात सावलीप्रमाणेच श्री. तळपदेंच्या बरोबर राहणार्‍या त्यांच्या पत्नीप्रमाणेच, या परकीय राजवटीच्या स्वार्थीपणाला, स्वकीयांच्याच उदासीनतेला कंटाळून श्री. शिवकर बापूजी तळपदेही इस.स १९१६ मध्ये हे स्वार्थी जग सोडून कायमचे निघून गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे संशोधन, भारतीय साहित्य बरीच वर्षे अंधारातच होते. मात्र,भारताच्या स्वातंत्र्यानंतरच त्यांचे संशोधन उजेडात येवू लागले. बंगलोर येथील एक फ़ोटोजर्नॅलिस्ट श्री.अय्यर यांनी तळपदे यांच्या संशोधनाचा पाठपुरावा केला आणि १९९५ मध्ये त्यांनी तळपदे यांच्या कुटुंबियांना भेटून तळपदेंच्या शोधाविषयी कागदपत्रे "हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड" कडे सूपूर्द केली.

हे लिखाण, हे सिद्ध करू शकत नाही की प्राचीन भारतीय प्रत्यक्षात विमाने बनवत होते की नाही, पण यावरून एक गोष्ट नक्की की, प्राचीन भारतीयांना विमाने कशी बनवतात याचे ज्ञान जरूर होते. कारण सर्वात आश्च्र्यजनक बाब म्हणजे आजही बर्‍याचशा भारतीय भाषांत "विमान" अथवा त्याचा अपभ्रंश "बिमान" या शब्दाचा वापर होतो, हीच गोष्ट प्राचीन भारतीयांचे "विमानशास्त्र" सिद्ध करण्यास पुरेशी आहे. आताच्या Air Craft सारख्या ओढून-ताणून बनवलेल्या शब्दासारखा नव्हे..........!!!



रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईच्या चौपाटीवरच फ़िरताना आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारी विमाने पाहून याच भूमीवरच कधी काळी एका मराठी शास्त्रज्ञाने पहिल्यांदा विमान उडवले असेल असा विचारही आपल्या मनात शिवत नाही, कारण येथे तळपदेंचे कुठलेही स्मारकही नाही. म्हणूनच,या संशोधकाचे आणि त्याच्या शोधाचे गूढ हे शेवटपर्यंतच गूढच राहीले...!! इ.स. ११९३ साली बख्तियार खिल्जीच्या इस्लामी हल्ल्यात कायमचेच नष्ट झालेल्या नालंदा विद्यापिठासारखे.!!!!