Thursday, January 14, 2010

Bhayyanchya Rajjyat

MaharashtraTimes - रोहन जुवेकर १५ जानेवारी 2010
या भैय्यांना पुन्हा युपी-बिहारला हकलून दिले पाहिजे... असे थेट टोकाचे ' राज ' कारण आपल्या महाराष्ट्रात तापले असताना त्याच भैय्यांच्या राज्यात जाण्याचा योग आला. पण या सा-या प्रवासात जे जाणवले ते काहीसे अपेक्षित असले तरी त्यात काही धक्केही होते आणि काही बुक्केही... आपलं हिंदी कितीही चांगलं असले तरी उत्तर भारतात गेल्यावर त्याचे पितळ उघडे पडते. तुमच्या उच्चारावरून, बोलण्याच्या शैलीवरून तुम्ही तिथले नाहीत हे त्यांना सहज जाणवते आणि मग प्रश्नांचा भडीमार सुरू होतो...कहासे हो भैय्या ? बंबई से ?... आपण ज्यांना भैय्या म्हणतो ते भय्ये आपल्याला भाऊ या अर्थाने भैय्या म्हणतात तेव्हा काहीच कळेनासे होते. परत त्यांना बंबई नाही ' मुंबई ' म्हणा असे शिकवत बसण्यातही शहाणपणा उरत नाही. खरं तर आधी मुंबईतून कोणी आलंय की अमिताभ दिखता है क्या, हेमा मालिनी कहा रहती है असे प्रश्न विचारले जायचे. आताही बॉलीवूडबद्दलचे आकर्षण कमी झाले नसले तरी त्यांना त्याहून मोठा असा अस्मितेचा विषय मिळालाय.. तो म्हणजे राज ठाकरे. शत्रुच्या सैन्याला जसे कुठेही संताजी-धनाजी दिसायचे तसे युपीमध्ये मराठी माणूस दिसला की राज ठाकरे आठवल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यासाठी राज ठाकरे हा व्हिलन असला तरी कामासाठी महाराष्ट्रात येणा-यांचा विषय निघाला की ते सांभाळून बोलायचे. फैझाबाद, वाराणसी, अलाहाबाद पट्ट्यात फिरताना, तिथल्या लोकांशी गप्पा मारताना हा विषय टाळायचा म्हटला तरी टाळता येत नव्हता. कुणी जहालपणे त्याच्याविरुद्ध बोलायचे तर कुणी मवाळपणे टोचायचे.. पण विषय निघायचाच. हे सारे असले तरी हे अटळ आहे याचीही जाणीव त्यांच्या बोलण्यातून जाणवायची. त्यामुळेच आमच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी स्वतःच्या प्रसिद्धीत गुंतलेत. इथे नवे उद्योग येत नसतील तर सरकारी नोकरी मिळवणे आणि संधी मिळताच राज्यातून बाहेर पडणे हाच पर्याय आहे. ज्यांना हे जमत नाही ते महाराष्ट्रासारख्या विकासात आघाडीवर असलेल्या राज्यात नोकरी शोधणार नाहीत तर काय करणार ? , असे अनेकांचे म्हणणे असल्याचे जाणवत होते. राज ठाकरे हा गुंड आहे असं म्हणत ते राग व्यक्त करायचे. त्यामुळे माझी काहीशी पंचाईतच व्हायची. त्यांच्या राज्यात त्यांना थेट भिडणे शक्य नसले तरी माझ्या परीने मी किल्ला लढवत होतो. या सा-या वादात एक चांगला मुद्दा मला त्यातल्याच एका भैय्याने दिला. युपीत राहणा-या एका व्यावसायिकाने मला असं सांगितलं, की मुंबईत राहून तिथल्या कायद्यांचे पालन केले, वेळेवर कर भरले आणि तिथल्या लोकांचा त्यांच्या भाषा व संस्कृतीचा आदर केला तर कोणीच त्रास देत नाही.बस्स.. त्यांचे हे वाक्य माझ्या पुढील प्रत्येक टप्प्यावरील प्रवासात राज ठाकरे वादावर पडदा टाकण्यासाठी उपयुक्त ठरलं. हे महाशय व्यवसायासाठी नियमित मुंबईत येतात हे नंतर कळलं. हा वाद सोडला तर युपीत बघण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. पण राज्य सरकारने स्वच्छता, शिस्त, कायदा-सुव्यवस्था याकडे प्रचंड दुर्लक्ष केल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होताना दिसते. विमानतळ आणि रेल्वे स्टेशनपासूनच या दुरावस्थेची सुरुवात होते. इथे पोलीस आणि सरकारी अधिकारीच गुटखा खाऊन थुकताना दिसतात. त्यामुळे एकंदरीत भय्याचे राज्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या असूनही पाहायची इच्छा उरत नाही. उत्तर प्रदेशात भव्य मंदिरं आहेत. वाराणसीत गंगा नदीवर तर अलाहाबादेत त्रिवेणी संगमावर अनेक राजमहाराजांनी बांधलेले घाट आहेत. आपल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या उत्तरेतल्या एका स्वारीच्यावेळी गंगेच्या किना-यावर बांधलेला राजा घाट देखिल पाहायला मिळतो. पण या सगळ्या पवित्र ठिकाणी अस्वच्छता पसरलेली दिसते. एकानं आम्हाला सांगितलं ; ‘ तुम्हाला वाराणसी, अयोध्या, काशी या ठिकाणी असंख्य मंदिरं दिसतील. पाहून कंटाळाल पण मंदिरं संपणार नाहीत. ’ तर अशा या ठिकाणी श्रद्धाळू व्यक्तीनं जाण्याचा निर्णय घेतला तर त्याला अनेक ठिकाणी बेशिस्त, अस्वच्छता आणि पैसे खाण्यासाठी धडपड करणारे खूप दिसतात. नदीत स्नान करायचे किंवा होडीतून फिरायचय तर आमच्यासोबत चला असं सांगत किमान दोन-चार हजार रुपयांची मागणी करणारे सापडतात. कुठले तरी विधी करुन देतो म्हणत अनेक पंडित आपल्याला घेराव घालतात. अशावेळी पहिल्यांदाच आलेला माणूस बावचळून जातो. अर्थात हे महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये आणि गोदाकिनारी थोड्या फरकाने दिसतेच. त्यामुळे विशेष काही वाटले नाही. पण युपीतल्या प्रमुख मंदिरात जाताना होणारी तपासणी म्हणजे डोक्याला ताप आहे. अयोध्येचं राम मंदिर आणि काशीचं विश्वेश्वराचं अर्थात शंकराचं मंदिर येथील कडक सुरक्षा पाहिल्यावर, देवळात चाललोय की मंत्रालयात ? असा प्रश्न मला पडला. मंदिर-मशिद वादामुळे अयोध्येचा राम पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आपलं धनुष्य-बाण घेऊन एका तंबूत शांत उभा आहे, असेच वाटले. मी गेलो तेव्हा सशस्त्र पोलिसांच्या सात बटालियन रामभूमी भोवताली तैनात होत्या. रामाचं दर्शन घेण्यासाठी जाताना रिकाम्या हाताने जावं आणि पोलिसांनी प्रत्येक टप्प्यावर अडवून काही प्रश्न केले तर त्यांची प्रामाणिक उत्तर द्यावीत एवढचं तुमच्या हातात असतं. मी हे सगळं दिव्य करुन एकदाचा गेलो आणि जेमतेम एक-दोन सेकंद दर्शन घेऊन लगेच पुढे सरकलो. पोलिसांनीच तसा आदेश दिला. तसाच काहीसा प्रकार काशीत झाला. स्थानिक सांगतात की, काशीत जिथे मशिद आहे तिथे कोणे एके काळी शंकराची पिंड होती. जेव्हा मशिदीची निर्मिती झाली त्यावेळी तडजोड करुन मशिदीजवळ दुसरे देऊळ बांधण्यात आले पण नंदी बैल होता तसाच राहिला. त्यामुळे आजही नंदी मशिदीकडे पाहतोय आणि नेमक्या याच स्थितीमुळे नंदी फक्त शंकराकडे पाहतो असं सांगणारे राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत मशिद पाडण्याची भाषा अधूनमधून करत आहेत. या सगळ्या संवेदनशील वातावरणामुळे काशीच्या विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देखिल पोलिसांच्या तीन-चार चौक्या पार कराव्या लागतात. सगळीकडे आपली तपासणी होते. एखादी संशयास्पद वस्तू आढळली तर लगेच जप्त करुन बाहेर पडताना न्या, असे सांगितले जाते. या सगळ्याचा अनुभव घेत दर्शन घेण्यासाठी जाताना, मुंबईत मंगळवारी सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहणे परवडले पण इथलं सतत पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि सारखं अंगझडतीला सामोरं जाणं नको असं क्षणभर वाटलं. काशी विश्वेश्वर आणि अयोध्येचा राम सोडला तर बाकी मंदिरात पोलिसांचा त्रास नव्हता पण अस्वच्छता प्रकर्षाने जाणवली. हनुमान मंदिरात तेल आणि शंकराच्या मंदिरात दूध इतस्ततः मोठ्या प्रमाणावर सांडलेल्या अवस्थेत बघितल्याने खूपच वाईट वाटलं. इथे मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याची इच्छा कुणालाच कशी होत नाही ? , याचे आश्चर्य वाटले. बरं अव्यवस्था फक्त मंदिरांतच आहे असं नाही तर राज्यातच सर्वत्र ही परिस्थिती दिसून येते. कारने प्रवास करताना अनेकदा मला इथल्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले अनुभवता आले. ही परिस्थिती पाहिल्यावर युपीतून येणारे अनेकजण मुंबईत येऊन रिक्षा-टॅक्सी कशी चालवतात याचा व्यवस्थित उलगडा झाला. युपीत पैसे दिले तर ऑल इंडिया ड्रायव्हिंग लायसन्स आणि ऑल इंडिया आर्म्स लायसन्स (शस्त्र परवाना) सहज मिळतं. राज्यातल्या ठराविक भागात देशी कट्टा अन विदेशी बनावटीच्या गन यांचे घराघरांमध्ये मिनी मॉल आहेत. पण पोलिसांच्या गाडीला पुरेसे पेट्रोल नाही आणि बहुतांश पोलिसांची शस्त्रे भंगारात फेकायच्या लायकीची झाली आहेत. या अजब परिस्थितीमुळे इथल्या बहुसंख्य नागरिकांना पोलिसांचे विशेष भय नाही. लाचखोरी आणि बेकायदा वर्तन यांना तर काही सीमाच नाही. दुतर्फा असणा-या राष्ट्रीय महामार्गावर इथे दोन्ही बाजूस दुतर्फा वाहतूक दिसून येते. लेन पकडून गाडी चालवणे, सिग्नल हे असले प्रकार युपीत फारसे प्रचलित नसावेत. आपण सांगायला गेलो तर ‘ अरे ला का रे ’ ची भाषा सुरू होते. त्यात मी महाराष्ट्राचा, म्हणजे कायदा शिकवण्याच्या नादात वरची वाट धरावी लागण्याचा धोका. त्यामुळे मी वाद घालण्याच्या भानगडीत पडत नव्हतो. वाहन चालकांच्या मनमानी कारभाराने गाड्या एकमेकांसमोर येऊन अनेकदा वाहतूक कोंडी झालेली पाहावी लागली. मी गेलो तेव्हा लग्नाचा हंगाम सुरू होता. रात्री जंगी मिरवणूका निघायच्या आणि अनेक रस्त्यांची वाहतूक ठप्प झालेली असायची. या बिकट परिस्थितीत एखाद्या गल्लीमार्गे पुढे जाण्याचा प्रयत्न करणे एवढेच हातात असते. मी याच पर्यायाचा उपयोग केला तरी दोनदा प्रचंड कोंडीचा सामना करावा लागलाच. या कोंडी संदर्भात नातेवाईकांशी बोलताना कळलं की, काही वेळा वाहतूक कोंडी तब्बल १०-१२ तास राहिली आहे. इथले बरेचसे वाहतूक पोलिस वाहतूक नियंत्रण सोडून शांतपणे गुटखा खाण्यातच गुंतले असतात हे देखिल समजलं. एकूणच वाहतूक कोंडी ही आणखी एक समस्या आहे. इथेच घडलेला एक किस्सा आठवला, म्हणून सांगतो. वाराणसीत एका रस्त्यावर दिव्याच्या खांब पडला. लोकांनी लगेच खांबावर सिमेंट ओतलं आणि मोठा स्पीडब्रेकर बनवला. वाहतूक पोलिसांच्या नियमानुसार, त्या ठिकाणी स्पीडब्रेकरची आवश्यकता नव्हती, पण लोकांनी त्याची निर्मिती केली आणि आजपर्यंत हा स्पीडब्रेकर तसाच आहे. दिव्यांची व्यवस्था पाहणारे बहुधा झोपले असावेत, कारण गेल्या कित्येक महिन्यात परिसरात देखभालीचे कामच झालेले नाही. त्यामुळे खांब पडल्याचे संबंधितांना अजूनही माहित नाही. नियम, कायदे बासनात गुंडाळून स्व-मर्जीने कारभार करणा-यांची संख्याच युपीत जास्त आहे. पैशांच्या जोरावर अनेक बेकायदा गोष्टी सुरू आहेत. युपीच्या एका बाजूस भारताची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या सीमेवरुन आजही मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. इथल्या अनेक कॉलेजांमध्ये अमली पदार्थ व्यापार, गुंडगिरी खुलेआम सुरू आहे. वाराणसीत विमानतळापासून दहा किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या कॉलेजात शस्त्रास्त्रे विनासायास येतात. लखनऊच्या विमानतळाबाहेर पोलीस कमी पण भिकारी जास्त अशी परिस्थिती आहे. विमानतळाबाहेर पडण्याचे रस्ते खूपच अरुंद आहेत. देशाला सर्वाधिक पंतप्रधान देणा-या युपीमध्ये आजही प्रचंड गरिबी आहे. युपीची शान वाढवणा-यांपेक्षा या राज्याला बदनाम करणा-या बाबी खूप ठळकपणे दिसतात. दुर्दैव याचेच वाटते की, ज्या राज्याने बुद्धाचा अहिंसेचा संदेश सांगितला, राजमुद्रेच्या रुपात भारताला ओळख मिळवून दिली, बनारस हिंदू विश्व विद्यापीठातून बुद्धीमान तरुणांची फौज दिली त्याच युपीत आज जात, धर्म आणि भाषेला पुढे करत मोठ्या प्रमाणावर भावनिक राजकारण केले जात आहे. शाहू, फुले, आंबेडकर, कांशीराम आणि मायावती यांच्या नावाने स्मारके बांधण्यात कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी मुख्यमंत्रीच केंद्राला पत्र पाठवून युपीची फाळणी करण्याची मागणी करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या राज्यातल्या तरुण-तरुणींनी सिंहाचा वाटा आहे, त्याच राज्यातल्या नव्या पिढीला नोक-यांच्या अनुपलब्धतेमुळे राज्याबाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, हीच या राज्याची शोकांतिका आहे.